अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विष्णू इरिगिरेड्डी असं त्यांचं नाव असून ते गिर्यारोहण करत असताना त्यांचा अपघात होऊन ते 400 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.वॉशिंग्टनमधील नॉर्थ कॅस्केड्स पर्वतरांगेत झालेल्या एका भीषण दु्र्घटनेत तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. यात भारतीय वंशाचे विष्णू इरिगिरेड्डी (Vishnu Irigireddy) यांचाही समावेश आहे. ते 48 वर्षांचे होते आणि सिएटल येथे राहत होते. ही दुर्घटना मे महिन्याच्या 11 तारखेला घडल्याची माहिती आहे.वृत्तसंस्था पीटीआयनुसार, इरिगिरेड्डी हे ग्रेटर सिएटल क्षेत्रातील चाचणी उपकरण निर्मिती कंपनी फ्लूक कॉर्पोरेशनमध्ये अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष होते.विष्णू आणि त्यांच्या सोबतच्या इतर दोघांचा सुमारे 400 फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला आहे. त्यांची नावं 38 वर्षीय टिम गुयेन आणि 36 वर्षीय ऑलेक्झांडर मार्टिनेंको असल्याची माहिती आहे. तर, सुदैवाने त्यांच्या गटातील अँटोन त्सेलीख (Anton Tselykh 38) नावाची व्यक्ती या दुर्घटनेत बचावली आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने स्वतः 64 किलोमीटर गाडी चालवत मदत मागितली.










