सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल झाली आणि अवघ्या सहा तासांत मुलीचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.सोलापूर: सोलापुरातील बस स्थानकातून चिमुकली हरवल्याने कुटुंबासह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. याबाबतचा मेसेजही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने पावले उचलली आणि खाकी वर्दीतील बाप माणूस धावल्यामुळे काही तासांतच साडेतीन वर्षीय लेक तिच्या पित्याकडे सुखरूप पोहोचली.मिळालेल्या माहितीनुसार, मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला सोलापूर पासून १०० किलोमीटर अंतरावर मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.










