चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात (Tiger Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूमिका दीपक भेंदारे (28) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. त्या आपल्या पती आणि गावातील इतर लोकांसोबत सकाळी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. अशातच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या 3 महिलांचा तर काल(11 मे) मूल तालुक्यातील महादवाडी येथे एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.










