जळगावमध्ये २५० कोटींचे विभागीय क्रीडा संकुल; उभारणीची प्रक्रिया सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामीण भागासाठी १४ लाखांचे क्रिडांगण अनुदान; होतकरू खेळाडूंना मिळणार बळ . जळगाव,दि. ४ मे – जळगाव जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा जिल्ह्यातील पाच खेळाडूंना राज्यस्तरीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असून, २५० कोटी रुपये खर्चून जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातही १४ लाख रुपये निधीतून क्रिडांगणांची उभारणी होणार असून, त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ, व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव समारंभ ४ मे रोजी पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.गाव तिथे व्यायामशाळा व क्रीडा संकुल उभं करण्याचा शासनाचा निर्धार असून, आमदार राजूमामा भोळे यांनी मांडलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.आ. भोळे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या क्रीडा संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त करत सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले.










