नऊ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने अश्विनी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट करून आरोपींना शिक्षाही ठोठावली. मात्र, अद्यापही पोलिस दलाकडून अश्विनी यांच्या मृत्युदाखल्यासाठी सहकार्य केले जात नसल्याचे गोरे यांचे म्हणणे आहे.नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असला तरी, त्यांचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. अश्विनी यांच्या मृत्युदाखल्यासाठी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही होत नसल्याचा कुटुंबीयांना आरोप आहे.अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाल्यानंतर पती राजू गोरे यांनी अश्विनी यांचा मृत्युदाखला मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, अश्विनी यांचा मृतदेह सापडला नाही किंवा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही, अशी कारणे देऊन मृत्युदाखला देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.










