पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा दिला आहे. त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून आक्रमक भूमिका घेतली आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा दिला की, भारताच्या कोणत्याही ‘लष्करी साहसाला’ ‘त्वरित, दृढ आणि कडक प्रत्युत्तर’ देण्यात येईल. सशस्त्र दलांनी आयोजित केलेल्या फील्ड ट्रेनिंग सरावाचे साक्षीदार होण्यासाठी मुनीर ‘फायरिंग रेंज’मध्ये आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि नवी दिल्लीकडून प्रत्युत्तराची इस्लामाबाद सैन्याला भीती असताना त्यांचे हे विधान समोर आले आहे. यापूर्वी मुनीर यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते.
‘भारताच्या कोणत्याही लष्करी चुकीच्या कृतीला जलद, ठाम आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल यात कोणतीही संदिग्धता नसावी,’ असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानची सरकारी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ‘पाकिस्तान प्रादेशिक शांततेसाठी वचनबद्ध असला तरी, आम्ही राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहोत,’ असे मुनीर यांनी टिल्ला फील्ड फायरिंग रेंज (TFFR) येथे सैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे.लष्कर मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजचा हवाला देत एपीपीने वृत्त दिले आहे की, जनरल मुनीर यांनी ‘हॅमर स्ट्राइक’ सराव पाहण्यासाठी टीएफएफआरला भेट दिली आहे.









