जळगाव, दि. १ मे – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगाव आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून शहरात महिला सबलीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. पिंक ऑटो योजनेच्या अंतर्गत नव्या सहा महिलांना अर्थसहाय्याचे प्रति महिला तीस हजार रुपयांचे (डाऊन पेमेंट) धनादेश आज रोटरी हॉल, गणपती नगर,जळगाव येथे प्रदान करण्यात आले.रोटरी क्लबच्या आर्थिक मदतीमुळे रेश्मा पाटील, मनीषा ढाके, अनिता अहिरे, योगिता पाटील, प्रतीक्षा राणे आणि बेबी बारी या सहा महिला नव्याने पिंक ऑटो रिक्षा चालक मालक होणार आहेत. दरम्यान या महिलांना पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.










