अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची ग्वाही लातूर, दि. ०४ : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पिक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. हा समारंभ झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोघेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. २ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले.










