देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम करणाऱ्यात शिक्षकांचा वाटा मोठा
– ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
जळगाव -कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यापासून वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचे उद्याचे भवितव्य निर्माण करीत असतात. त्यामुळेच देशाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोठा आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
शहरातील गंधे सभागृहात 5 सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2024 च्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम या जिल्ह्यातील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून उद्याची पिढी घडत असते शिक्षक वेगवेगळे विद्यार्थी तयार करण्याचे काम करतात. त्यातूनच अनेक मोठ्या पदावरील अधिकारी, राजकारणी, कलावंत तसेच विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक घडत असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक शिक्षक येतात की त्यांना आपण विसरू शकत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. आजची तरुण पिढी कुठे भरकटते आहे काbयाचा विचार करून बाल वयाचे शिक्षक व पालक यांच्याकडून त्यांच्यावर कसे संस्कार केले जातील याचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील वेटिंग करावी लागते ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून शिक्षकांच्या प्रयत्नामुळेच अत्यंत संस्कारक्षम पिढ्या घडू शकतात.
आदर्श शिक्षक पुरस्कार वाटपात आता पूर्णपणे पारदर्शकता आलेली असून हे पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी देखील आता गुणवत्तेची गरज आहे. असे प्रतिपादन देखील गिरीश महाजन यांनी केले.
दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित शिक्षकांची संवाद साधताना पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा आत्मा असून प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्व मोठे आहे. जळगाव जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेत कुठेही कमी राहिलेला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणावर उंचावलेला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेलो नसलो तरी सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मी अभिनंदन करतो तसेही त्यांनी यावेळी सांगितले.










