
शिवसेना भवन परिसरात शेकडो ठाकरे गटाचे समर्थक जमले. या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जात होता. पण याचवेळी पोलिसांचं घटनास्थळी आगमन झालं. त्यामुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला. पोलीस सध्या परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.शिवसेना भवन परिसरात आज अचानक मोठा गदारोळ बघायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आज दादर येथील शिवसेना भवन येथे जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून दादर, माहीम आणि मुंबईच्या इतर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठ्याच्या याच समस्येवरुन ठाकरे गट आक्रमक झालेला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी याआधीदेखील या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतली होती. तसेच त्यांनी टँकर असोसिएशनच्या संपावरही भूमिका मांडली होती. मुंबईच्या धरणांमध्ये पाणी कमी झाल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. पण यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय. याच समस्येवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी मुंबई महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चासाठी रितसर परवानगी देखील मागण्यात आली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. तरीदेखील आज ठाकरेंचे शेकडो शिवसैनिक शिवसेना भवन येथे दाखल झाले. हे शिवसैनिक मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा घेऊन जाण्याच्या पवित्र्यात होते. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला. पण याचवेळी पोलिसांचं आगमन झालं. त्यामुळे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात गोंधळ झालेला बघायला मिळालाकुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यावर शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर मोर्चा घेऊनच जाणार, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ बघायला मिळाला. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जात आहे. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे.