
या प्रकरणात कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना शुक्रवारी गडचिरोली येथून अटक केली. दोघांचीही दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. चौकशीदरम्यान नीलेश मेश्राम याने नियुक्तीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी पराग पुडके यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पदोन्नतीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात आला.बनावट शालार्थ आयडीच्या आधारे अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्याच्या प्रकरणाचा सूत्रधार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक नीलेश मेश्राम याने बोगस दस्तऐवज तयार करून दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात सदर पोलिसांनी नीलेश मेश्राम याच्यासह आणखी तिघांना गजाआड केले. याप्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. संजय शंकरराव दुधाळकर ( वय ५३ ), सूरज पुंजाराम नाईक ( वय ४० ),अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत. संजय हा उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक तर सूरज हा लिपीक आहे.
२०१० मध्ये मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षकपदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले. यासाठी नागपुरातील यादवनगरात असलेल्या एस. के. बी. उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळेत तो शिक्षक असल्याचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्राच्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी त्याला भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयात मुख्याध्यापक पदावर मंजुरी दिली. त्यापूर्वी त्याचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठीही मंजूरी दिली होती.या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी, वेतन निश्चिती अधिकारी तसेच इतर अधिकारी यांनी पैसे घेऊन पुडके यांच्या नावाने बनावट प्रस्ताव तयार केला, असे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.