
रिक्षाचालकाने आयुष्य संपवल्याची घटना खडकपाडा इथे समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. व्यक्तीने चिठ्ठी लिहून कारणही सांगितलं आहे.गाव-खेड्यांमध्ये शेतीच्या कामासह मुलांचं शिक्षण, लग्नकार्य आणि अन्य कामांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो. मात्र शहरी भागातही हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्यांनाही आत्महत्येशिवाय पर्याय उरत नसल्याची एक घटना कल्याणच्या खडकपाडा परिसरात घडली आहे. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीतून ही बाब समोर आली आहे.मुलांच्या शिक्षणाची फी भरण्याकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरलेल्या एका रिक्षाचालकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विजय जीवन मोरे असं आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे. तर त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा सचिन दळवी आणि त्याच्यासोबतची एक अनोळखी महिला आहे.या संदर्भात मृत विजय मोरे यांचा मोठा भाऊ राजू जीवन मोरे (५२) यांनी बुधवारी ९ एप्रिल रोजी दिलेल्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार राजू मोरे हे देखील रिक्षाचालक असून ते विजय मोरे कुटुंबियांच्या घरा शेजारीच राहतात. विजय मोरे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. ३१ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास विजयचा मृतदेह घरातील किचनमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला.घरातला कर्ता पुरूष गेल्याने मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या भावाने कर्जदारांच्या अर्थात सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे आरोप राजू मोरे यांनी त्यांच्या जबानीत केला आहे. सुरूवातीला भावाने केलेल्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नव्हतं. मात्र भावाची पत्नी अर्चना हिच्याकडून वस्तुस्थिती समोर आली. त्याशिवाय गळफास सोडवून तात्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासून विजय यांना मृत घोषित केलं. त्याच दरम्यान डॉक्टरांना विजयच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी डॉक्टरांनी मला दिली. सदरची चिठ्ठी आपण पोलीस ठाण्यात सादर केली, असंही त्यांच्या भावाने सांगितलं.मी विजय मोरे, मी माझ्या मनाने आत्महत्या करतो की, माझ्यावर कर्जदाराकडून खूप छळ केला जातो.
त्यामुळे माझ्या घरात उपासमारीची बारी आली आहे. माझ्या घरच्यांचा काही गुन्हा नाही. त्यांना दोषी ठरू नये. दोषी ठरवावे ते कर्जदरांना, त्याच्यामुळे आत्महत्या करतो. माझी बायको खूप चांगली आहे. तिला सांगणे आहे की माझ्याकडून खूप मोठा अपराध होतोय माला माफ कर, मुलांना चांगलं सांभाळ, मी मेल्यावर सदैव तुझ्या पाठीशी राहील. माझा मुलगा यश व माझी मुलगी प्रांजला मला माफ करा. चांगले राहा, खूप अभ्यास करा व खूप मोठे व्हा, मी सदैव तुमच्या पाठीशी राहील, मला माफ करा आपला विश्वासू – विजय मोरेमृत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या जबाबात म्हटलं आहे, की भावाची पत्नी अर्चना हिच्याकडून समजलं की, सचिन दळवी (रा. दत्तात्रय कॉलनी, मिलींदनगर, कल्याण- प) याच्याकडून विजय मोरे याने मुलांची फी भरण्याकरता कर्ज घेतलं होतं. परंतु ते किती घेतलं आणि कधी घेतलं याबाबत माहित नाही. तसंच कर्जाची वसुली करण्याकरता सचिन दळवी हा एका अनोळखी महिलेसह घरी येऊन शिवीगाळ करत असे. आत्महत्या करण्याच्या दोन-तीन दिवस आधी रात्री ७ ते ८ दरम्यान सचिन दळवी आणि अनोळखी महिला हे दोघे भावाच्या घरासमोरच उभे राहून त्याच्याकडे कर्जाच्या पैशांची मागणी करत होते.भावाने वेळ मागितला असता सचिन दळवी आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने विजयला मोठमोठ्या आवाजामध्ये शिवीगाळी केली. दमदाटी केल्यानंतर दोघे निघून गेले. तेव्हापासून विजय तणावामध्ये होता. त्यामुळे आपला भाऊ विजय याने सचिन दळवी आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने केलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची पूर्णपणे खात्री पटल्याचे राजू मोरे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे.
Video Player
00:00
00:00