
बोटीत पाणी शिरण्याच्या प्रकारामुळे अजिंठा बोटीचा परवाना निलंबित करत महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.गेटवे ते मांडवा या प्रवासात अजंता बोटीत पाणी शिरू लागल्याने १४२ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दोन स्पीड बोटी वेळीच धावल्याने सगळे प्रवासी दैव बलवत्तर म्हणून सुखरूप बचावले आहेत. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. अपघाताचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आल्याने आता या सगळ्याची गंभीर दखल राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली असून अजंता बोटीचा परवाना निलंबित करत चौकशीचे आदेश दिले आहेत.मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करणार आहे. तीन दिवसात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून नोंदणी प्रमाणपत्र तसंच सर्वे प्रमाणपत्र देखील मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेचे प्रवासी वर्गाकडूनही स्वागत करण्यात आलं आहे. यामध्ये जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बोटीचा प्रवासी परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी काही प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.अजंता कंपनीची प्रवासी बोट शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास १३० प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. भर समुद्रात मांडवा जेट्टी पासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये समुद्राचं पाणी शिरल्याचं निदर्शनास आलं. त्यावर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मांडवा जेट्टी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली.त्यानंतर मांडवा जेट्टी परिसरात समुद्रात असलेल्या बोटींनी तात्काळ प्रवाशांची मदत करून अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये घेऊन मांडवा जेट्टी येथे बोटींमध्ये सुरक्षित आणि सुखरुपरित्या पोहचवलं. या घटनेमुळे बोटीवरील प्रवाशांच्या जीविला धोका निर्माण झाला होता. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती. याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आणि सदर दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.या आदेशानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली आहे.
ही समिती सदर घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर आणि स्पष्ट अहवाल घटनेच्या कारणमीमांसासह तसंच शिफारसीसहित तीन दिवसात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.नितेश राणे यांनी या घटनेबाबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत असताना अशा घटना टाळण्यासाठी बोटींची नोंदणी तसंच तांत्रिक बाबींबाबत सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी विभागाला दिले आहेत.दरम्यान, यापूर्वी मार्च २०२० तसंच फेब्रुवारी २०२२ मध्ये अजंता बोट बुडण्याचं तसंच बोटीतून प्रवासी पाण्यात पडल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी घडलेल्या घटनेमधील बोट नवीन असताना बोटीत पाणी शिरते, यामागे पाण्यात बोट सोडण्यापूर्वी त्याची तपासणी योग्य प्रकारे झाली नसल्याचं समोर आलं होतं.
Video Player
00:00
00:00