रामनवमीच्या उत्सवात सहभागी झालेले वैद्य कुटुंब आनंदात घराकडे परत निघाले होते. परत निघताना संपूर्ण कुटुंबाला काहीच दिवसांत परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.वर्धा-समुद्रपूर मार्गावरून जात असताना अचानक रानडुक्कर आडवे आल्याने कार टँकरवर धडकली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास तरोडा शिवारात ही घटना घडली.
समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील प्रशांत वैद्य हे पोलिस कर्मचारी म्हणून वडनेरच्या ठाण्यात कार्यरत होते. रामनवमी असल्याने कुटुंबासह मांडगावला आले होते. सोमवारी रात्री गावावरून कारने परत वर्ध्याला निघाले. तरोडा गावाजवळील साखरा फाट्यावर अचानक कारसमोर रानडुक्कर आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले.कार समोरून येणाऱ्या डिझेलच्या टँकरवर धडकली. या अपघातात प्रशांत यांच्यासह पत्नी प्रियंका, मुलगा प्रियांश, मुलगी मनस्वी असे चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.









