विविध कारणांचे ‘अडथळे’ दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंबाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी आहे.एखादी घटना कळताच किंवा नियंत्रण कक्षाकडून कडून माहिती मिळताच पोलिसांनी दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, वाहतूक कोंडी, एकापाठोपाठ एक कॉल, व्हीआयपी बंदोबस्त, पोलिस ठाण्यातील इतर कामांमुळे पोलिसांना वेळेचे हे गणित जुळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, विविध कारणांचे ‘अडथळे’ दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंबाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी आहे.
मुंबई पोलिस दलातील १३ विभागांतील उपायुक्तांकडून सध्या दररोज पोलिस ठाण्यांमधून आढावा घेतला जात आहे. यामध्ये घटनास्थळी पोहोचण्यास दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतलेल्या पोलिस पथकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जात आहे.या नोटिशीद्वारे कारवाईचा इशारा, दंड ठोठावण्यात येत आहे. मुंबईतील अरुंद रस्ते, दुतर्फा असलेली पार्किंग, वाहनांची संख्यावाढ झाल्याने होणारी कोंडी, एकाच वेळी देण्यात येणारी अनेक कामे अशी अनेक कारणे विलंबामागे असतानाही अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात असल्याने पोलिस ठाण्यात जनरल ड्युटी करणारे, गस्ती वाहनावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे.नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सात ते दहा मिनिटांत पोहोचणे संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांना बंधनकारक आहे.









