
पुणे : दारात कचऱ्याचा डबा ठेवण्यावरून तरुणाला दगडाने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना पाषाण येथे मंगळवारी (१ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रमोद हनुमंत मेघावत (वय २८, रा. पाषाण) या तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सुगीबाई चव्हाण, युवराज चव्हाण आणि पन्नीबाई मेघावत (रा. पाषाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ एप्रिल) फिर्यादी प्रमोद याने कचऱ्याचा डबा दारात ठेवू नका असे आरोपींना सांगितले. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी प्रमोद याला दगडाने आणि दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर फिर्यादी याने पोलिसांत धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे आणि सहायक निरीक्षक सचिन कारंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहायक निरीक्षक कारंडे पुढील तपास करीत आहेत.