या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चार तासांच्या चर्चेला उत्तर देण्याची महत्त्वाची जबाबदारी गृहमंत्री-सहकारमंत्री अमित शहा यांनी मोहोळ यांच्यावर टाकली होती. मोहोळ यांनी सरकारची भूमिका ठासून मांडली. त्रिभुवनदास पटेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल हे मोठे नेते काँग्रेसचे असले तरी त्यांच्या महान कार्याचा योग्य सन्मान करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारची संस्कृती आहे असे त्यांनी सांगितले. देशातील सहकार क्षेत्रासाठीच्या पहिल्या त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यांच्या प्रादेशिक भाषांतून सहकाराचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात येईल व हेच विद्यापीठ देशाला सहकार क्षेत्रातील नवे नेतृत्व प्रदान करेल असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी राज्यसभेत केले.वरिष्ठ सभागृहाने रात्री साडेआठच्या सुमारास हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. केंद्र सरकार संघराज्य रचना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.










