मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २५ मार्च रोजी कुसगावच्या हद्दीत ताब्यात घेतलेल्या दोन कंटेनरमध्ये गोमांस असल्याचे निष्पन्न झाले आहे. हैदराबाद येथील मे. एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २५ मार्च रोजी लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मोठ्या संशयित वातानुकूलित कंटेनरमध्ये गोमांस असल्याचे असल तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मे. एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात बेकायदा गोमांस विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी; तसेच बनावट कागदपत्रांद्वारे गोमांस नसल्याचे दर्शवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद, तेलंगण येथून सुमारे ५७ टन गोमांस न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात होते. गोरक्षकांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी में. एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीचा मालक महंमद सादिक कुरेशी (रा. हैदराबाद, तेलंगण) व कंटेनरचालक नदीम कलीम अहमद व नसीर महंमद अहमद (दोघेही रा. न्हावाशेवा, नवी मुंबई) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी नमुने घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी अनिल परंडवाल यांना प्राचारण करण्यात आले व त्यांनी दोन्ही कंटेनरमधील प्रत्येकी १० बॉक्स असे २० बॉक्स तपासणीसाठी पाठवले होते.









