भाजपने विधानपरिषदेसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या यादीतील केचे यांच्या नावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष दंड थोपटले होते. प्रदेशाध्यक्षांनी चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली. या भेटीत केचे यांना विधान परिषदेत उमेदवारीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. भाजपचे उमेदवार सुमित वानखडे यांना बळ देऊन त्यांचा विजय निश्चित केला. शहा यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती रविवारी भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारीतून केल्याची चर्चा आहे.भाजपने विधानपरिषदेसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या यादीतील केचे यांच्या नावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. आष्टी तालुक्यातील अंबिकापूरमध्ये ५ एप्रिल १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. गावाजवळील बेलवाडीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी केचे यांनी आष्टी गाठले. आष्टी शहीद येथील हुतात्मा विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर आर्वी येथील कला व वाणिज्य विद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षणप्रवास केला.

सोबतच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण करून इन्स्टिट्यूट सुरू केली. हे करीत असताना केचे आणि त्यांच्या पत्नीला आर्वी नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा सहकाऱ्यांनी आग्रह धरला. १९९०मध्ये दोघांनीही निवडणूक लढवून विजय मिळविला. १९९५मध्येदेखील नगरसेवक झाले. पुढे भाजपचे आर्वी तालुकाध्यक्ष, वर्धा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. पक्षबांधणी करताना कार्यकर्तेही जोडले.केचे यांनी २००४मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला. २००९मध्ये परत त्यांनी निवडणूक लढवित काँग्रेसच्या अमर काळे यांचा पराभव केला. २०१४च्या निवडणुकीत केचे यांचा पराभव झाला. २०१९मध्ये भाजपने परत केचे यांच्यावर विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ करीत त्यांनी विजय मिळविला.










