शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे याने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली.बँकेच्या प्रांगणात शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या (Beed Crime) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बीड शाखेच्या प्रांगणात हा प्रकार घडला. ३० ते ३५ वर्ष वयोगटातील शिक्षकाने आत्महत्या केल्याचं सकाळी उघडकीस आलं. ही घटना समजताच लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. धक्कादायक म्हणजे मयत शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरुन एक चिठ्ठी (Beed Teacher Suicide Note) पोस्ट केली होती. “श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही” हे त्याचे शब्द कुटुंबाच्या काळजावर घाव घालणारे ठरले. ही घटना घडतात शिवाजीनगर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र मृताचे नातेवाईक येईपर्यंत पोलिसांनी पंचनामा केला नव्हता.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिक्षक हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी आहे. त्याचं नाव धनंजय अभिमान नागरगोजे आहे. तो केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होता. २०१९ मध्ये राज्य सरकारकडून २० टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या, आज सकाळी त्याने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण काय हे समजू शकलं नाही, मात्र जनमानसात होत असलेल्या चर्चेनुसार त्याने अनेकांची नावं घेऊन एक फेसबुक पोस्ट केल्याचे पुढे येत आहे.










