माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकर यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमधील नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपमधील स्थानिक नेत्यांकडून धंगेकर यांच्या प्रवेशानंतर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.धंगेकर आणि आमचा फक्त पंगा नाही, तर आम्ही एकमेकांच्या विरोधात तीन निवडणुका लढल्या आहेत. आणि त्यातली एक हरलो तर दोनदा त्यांना हरवलं आहे. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट काळाच्या ओघांमध्ये बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. राज्यामध्ये महायुतीच्या तीन पक्षांचं आमचं सरकार आहे. जर भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांना पक्षात घेण्याच्या विचार केला असता तर मी त्या विरोधात भांडलो असतो. मात्र महायुतीतील प्रत्येक पक्षाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे स्वातंत्र्य आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी ते मर्ज झालेले नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.










