जय महाराष्ट्र या घोषणेत जेवढी ऊर्जा आहे, तेवढीच ती मराठी माणसाच्या अस्मितेची साक्ष देते. महाराष्ट्र ही केवळ भूगोलाची संकल्पना नाही, तर इथल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि मुख्यतः मराठी भाषेचा गड आहे.भारताच्या इतिहासात भाषावार प्रांतरचना ही स्वाभाविक आणि संविधानाने मान्य केलेली गोष्ट आहे. महाराष्ट्राचा जन्म देखील मराठी भाषेसाठी झालेल्या लढ्याच्या बलिदानातून झाला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, १९६० च्या रणसंग्रामात १०६ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही भूमी मराठीसाठी राखली. आज, जर महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह धरला जात असेल, तर त्यात चुकीचे काय..?मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील स्थानिक भाषा बोलण्याचा आग्रह हा स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा भाग आहे. गुजरातीत गुजराती, तामिळनाडूत तामिळ, बंगालमध्ये बंगाली अभिमानाने बोलली जाते, तसेच महाराष्ट्रात मराठी बोलावी, वाढावी, फुलावी, यासाठीच आग्रह असतो.

मराठी भाषा टिकली पाहिजे, फुलली पाहिजे.. आज जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचा प्रभाव वाढला असला, तरी मातृभाषा टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. मराठीचा आग्रह म्हणजे दुसऱ्या भाषांचा तिरस्कार नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे.सरकारी कामकाज मराठीत व्हावे. व्यवसाय आणि उद्योगधंद्यात मराठीचा सन्मान वाढावा. शाळा-कॉलेजमध्ये मराठीला महत्त्व मिळावे.मराठी साहित्य, कला, नाट्य, संगीत आणि चित्रपटसृष्टी फुलावी.बोलू मराठी, जपू मराठीआपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजेच आपल्या अस्तित्वाचा सन्मान करणं. शिवरायांच्या भूमीत मराठी टिकली पाहिजे, फुलली पाहिजे आणि अभिमानाने वावरली पाहिजे. जय महाराष्ट्र..! ॲड जमील देशपांडे जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव









