यावल तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याने सात वर्षीय बालक गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साकळी जवळील मानकी शेत शिवारात घडली. या घटनेने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज ६ मार्च गुरूवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील साकळी गावा जवळच्या मानकी शिवारातील पाटचारी जवळील एका शेतात केश्या पेमा बारेला वय ७ वर्ष. हा कामासाठी गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्यात केश्या बारेला हा गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.सोबत शेतात काम करणाऱ्या स्त्री-पुरूषांनी ही घटना बघितल्याने मोठा आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.या घटनेची माहिती यावल वन विभागाला देण्यात आली असता यावल वन विभागाचे उपवनसंरक्षण जमीर शेख, वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसर पिंजून काढला. नंतर मात्र बिबट्या दिसून आला नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पिंजरा लाऊन पकडण्याची मागणी आता परिसरातून केली जात आहे.









