पुण्याजवळील दौंडमध्ये तिघे चड्डी-बनियान घातलेले एका घरात घुसले आणि त्यांनी दगड आणि काठ्यांनी कुटुंबाला मारहाण केली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत माजली आहे.पुण्याजवळील दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन जवळ एका घरात बुधवारी (०५ मार्च) रात्रीच्या साडेदहा अकराच्या दरम्यान चड्डी आणि बनियान घातलेले तिघेजण घुसले. त्यांनी घरातील पाच व्यक्तींना दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या भयंकर घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण अती गंभीर झाल्याची माहिती आहे. या घटनेत इतर तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, जुन्या वादातून हा प्रकार घडला की चोरीचा प्रकार होता याची चर्चा सध्या सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात यवत पोलिसांनी दोन संशयित नातेवाईकांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रकार चोरीचा की जुन्या वादाचा याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.










