साताऱ्यात हेल्मेट घालण्याचा आईचा आग्रह ठेवला असता, सूरज जाधवचा जीव वाचला. मात्र, त्याचा मित्र राजेश शिंदे जो हेल्मेटशिवाय होता, तो अपघातात कोमात गेला आहे. मोळाचा ओढा परिसरातील या घटनेने सर्वांचे मन हेलावले आहे. घटनेने हेल्मेट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले.हेल्मेट घालूनच दुचाकी चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या आईमुळे एका तरुणाचा जीव वाचला. मात्र, त्याच्या दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या तरुणाच्या मेंदूला अपघातात मार लागल्याने तो कोमात गेला आहे. मोळाचा ओढा परिसरात घडलेली ही घटना साऱ्यांचेच मन हेलावणारी ठरली. सूरज जाधव (वय २४) आणि राजेश उर्फ पिंटू शिंदे (वय २४, दोघेही रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) हे दोघे मित्र आहेत. सूरजला पुण्यातून नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावणे आल्याने दोघेही दुचाकीवरून पुण्याकडे निघाले.
घरातून निघताना हेल्मेटने, असा आग्रह सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन उतरली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे निरुपाय होऊन सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.मी नेहमीच दुचाकीवरून जातो, तू काळजी करू नको, असा दिलासाही सूरजने आईला दिला. त्यावर पोचल्यानंतर फोन करण्यास सांगून आई माघारी वळली. त्यानंतर दीड तासांनी सूरजच्या आईला फोन आला आणि दुचाकीवरील दोन्ही मुलांना अपघात झाला असून, त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे, असा निरोप मिळाला.









