सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्राला २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यात या घरकुलांसाठीचा प्रत्यक्ष हप्ता जमा होणे हा क्षण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक सोहळा आहे. या योजनेतून सर्वसामान्य गरीब माणसाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रत्येक बेघराला घर देण्याचा संकल्प हाती घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात २० लाख नागरिकांना आपल्या स्वतःच्या घरात प्रेमाचा संसार फुलविता येणार आहे.या योजनेसोबतच राज्यातील अन्य आवास योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घरकुले साकारली जात आहेत.
सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत परवडणारी व पर्यावरणपूरक घरे, ज्येष्ठ नागरिकांकरीता घरे साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री यांनी राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना चालना दिली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन महत्त्वपूर्ण गरजा असून त्यापैकी घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शिंदे यांनी आभार मानले. नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकार व राज्य शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताअंतर्गत नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्नपुर्तीकरीता देशामध्ये २ कोटी घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी अधिकाधिक घरे राज्यातील नागरिकांना मिळवून देण्याकरीता राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यशासनाने १०० दिवसाचा विशेष कृती उपक्रमाअंतर्गत लोककल्याणकारी योजना व विकास कामांना गती देण्यात येत आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने घरकुलांना मंजुरी, हप्ता वितरण, घरकुले पूर्ण करण्यासोबतच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची कामे करण्यात येत आहेत.
महाआवास अभियानाअंतर्गत १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असून १०० दिवसाचे उद्ष्टि केवळ 45 दिवसात पूर्ण केले आहे. लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम चांगल्या पद्धतीने करुन घ्यावे. कामे करीत असतांना अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कळवाव्यात, त्या प्राध्यान्याने सोडविण्यात येतील. नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकार व राज्य शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.









