केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेंचा युवकांशी संवाद. जळगाव केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमास उत्साहात सुरुवात झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (KBC NMU) १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत मुंबईतील २७ युवक-युवती सहभागी झाले असून, त्यांनी जळगावमधील विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी युवकांनी केसीआयआयएल (KCIIL) आणि विद्यापीठाला भेट देऊन स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी युवकांना समाज आणि राष्ट्रनिर्माणातील जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच, नंदू जाधव यांनी महाराष्ट्रातील बालविवाहसंबंधी प्रश्नांवर चर्चा केली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषी परंपरेबाबत माहिती दिली. त्यांनी “माय भारत” (MY Bharat) पोर्टलची माहिती देत युवकांना या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याचे आवाहन केले.युवकांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा केली. मंत्री श्रीमती खडसे यांनी ‘विरासत से विकास’ या दृष्टिकोनावर प्रकाश टाकत, युवकांना सामाजिक विकासात सक्रीय सहभाग घेण्याची प्रेरणा दिली. तसेच, ‘खेलो इंडिया’ आणि भारताच्या २०३६ ऑलिंपिक तयारीविषयीही माहिती दिली.येत्या काही दिवसांत हे युवक लालमाती आश्रमशाळेला आणि अजिंठा लेणींना भेट देतील. तसेच, विविध विषयांवरील व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.









