टवलार ग्रा.पं.च्या सचिवावर शिस्तभंगाची कारवाई करा युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची मागणी.वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून अतिक्रमणास प्रोत्साहन देण्याचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे आदेश असतानाही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई न करता आदेशाची पायमल्ली करून अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्या अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या टवलार ग्रामपंचायतचे सचिव अजय देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांनी केली आहे. अचलपूर तालुक्यातील टवलार ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावे असे आदेश अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी टवलार ग्रामपंचायतचे सचिव अजय देशमुख यांना दिले होते. अचलपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीही सदर अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश 16 ऑक्टोबर 2024 रोजी पत्राद्वारे दिले होते. मात्र टवलार ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व पदाधिकारी यांनी जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली नाही.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली झाली असून कर्तव्यातही संबंधित ग्रामसेवकने हयगय केली आहे.त्यामुळे ग्रामसेवक अजय अंबादास देशमुख यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इमरान पठाण यांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे, जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटणकर व स्वप्निल चव्हाण, जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे, निलेश गजभिये, सुधीर तायडे, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी रामेश्वर सुलताने आदी उपस्थित होते.









