कृत्रिम वाळूसाठी सह्याद्री घाटमाथ्याची होतेय चाळण!
कोल्हापूर : दगडांच्या माध्यमातून कृत्रिम वाळू मिळविण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून सह्याद्री घाटमाथ्याची अक्षरश: चाळण सुरू आहे. अधिकृत आणि अनधिकृत दगड खाणींच्या माध्यमातून दररोज हजारो ब्रास दगड आणि मुरूमाची अक्षरश: लयलूट सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात सह्याद्रीचे पर्यावरण धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कृत्रिम वाळूचा वापर
चुकीची शासकीय धोरणे आणि हरित लवादाच्या निर्णयामुळे 19 एप्रिल 2017 पासून राज्यावर वाळू उपसा बंदी लादली गेली आहे. त्यावर उपाय म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्यातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कृत्रिम वाळूचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील बांधकामांना मिळून वर्षाकाठी जवळपास तीन कोटी ब्रास (सुमारे 75 लाख ट्रक) वाळू लागते. मात्र सध्या राज्यात वाळूची उपसाबंदी लागू असल्याने लागणार्या वाळूपैकी जवळपास दोन कोटी ब्रास वाळूची गरज कृत्रिम वाळूपासून भागविली जात आहे. वाळू तस्करीच्या माध्यमातून आणि परराज्यातून येणार्या वाळूतून उर्वरित गरज पूर्ण होताना दिसते आहे.












