सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरी लाखोंची चोरी
मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अशा एका चोरट्याला अटक केली आहे, जो मुंबईतील उंच इमारतींमध्ये पाईपद्वारे चढायचा आणि तो घरातून चोरी करून पळून जायचा. आरोपी स्पायडर मॅनने 2 आठवड्यात मुंबई उपनगरात पाईपवर चढून 11 चोरी केल्या आहेत. कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू हा 11 जूनला रात्री 11 ते पहाटे 4 च्या दरम्यान कांदिवली पश्चिमेतील नमन टॉवर येथे राहणारे सेवानिवृत्त बँक अधिकारी अरुण शहा यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरी पाईपच्या सहाय्याने चढला. तिथून तो लाखो रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून पळून गेला होता”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली.
कांदिवली पोलिसांनी मुख्य आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू आणि त्याचे दोन साथीदार रजब खान, देव बनिया या दोघांनादेखील अटक केली आहे. आरोपींनी दोन आठवड्यात बोरिवली, MHB, कांदिवली आणि गोरेगाव परिसरातील तब्बल 11 ठिकाणी चोरी केली आहे. यापूर्वी देखील आरोपींच्या विरोधात 8 चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सीसीटीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींना गजाआड केलं आहे.
मुंबईत स्पायडर मॅन स्टाईलमध्ये शहरातील उंच इमारतींवर चढून चोरी करणाऱ्या तथाकथिक स्पायडर मॅनला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा स्पायडर मॅन उंच इमारतींवर पाईपच्या साहाय्याने चढायचा. तसेच संधी मिळेल त्या घरात घुसून जबर चोरी करायचा. त्याने या माध्यमातून 2 आठवड्यात तब्बल 11 ठिकाणी चोरीदेखील केली.