बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. तुळजाराम चतुचंद महाविद्यालय रस्त्यावर ही घटना घडली. मावस बहिणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीत घडलेला हा तिसरा खून असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. बारामतीत सहा महिन्यापूर्वीच तुळजाराम चतुचंद कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निर्घृण वार करत खून करण्यात आला. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार असून या घटनेने बारामती हादरली. बारामतीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. हातावर नाकावर, डोळ्यावर आणि मानेवर कोयत्याने जोरदार वार केल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा मावस बहिणीशी बोलतो याचा राग येऊन तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत अनिकेचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे) 2) महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे) 3) संग्राम खंडाळे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत. राज्यामध्ये कायदा सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहेत. कल्याणमध्ये मराठी माणसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठी माणसे घाण आहात तुम्ही मासे खाता, तुमचा वास येतो म्हणत अखिलेश शुक्ला याने मराठी भाषिकांन सराईत गुंडांना सांगून माराहण केल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला आहे. तर नागपूरमध्ये पेट्रोल चालक महिलेचा जाहिररित्या अपमान करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्या महिलेला माफी मागायला लावली. १८ डिसेंबरला हा प्रकार झाला. या घटनांमुळे राज्यात कायदा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.