लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसलगतच्या फुलराई या गावातील एका सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 122 भाविकांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्घटना घडली. दीडशेवर लोक जखमी आहेत. दुर्घटना भयावह होतीच, दुर्घटनेनंतरची परिस्थिती अधिक भीषण होती. थोड्याच वेळेपूर्वी जिथे जल्लोष होता, तिथे केवळ आक्रोश उरलेला होता. हाथरसपासून 47 कि.मी.वर असलेल्या फुलराई गावात भोले बाबा ऊर्फ नारायण साकार हरी यांच्या सत्संगाला भाविकांची अलोट गर्दी झाली. ती अनियंत्रित झाली आणि हे अघटित घडले. उपलब्ध होईल त्या वाहनांनी जखमी व मृतांना एकत्रित टाकून रुग्णालयापर्यंत आणण्यात आले.
हाथरस रुग्णालयातील शवागारात मृतदेहांसाठी जागा नसल्याने बाहेर जमिनीवरच मृतदेह टाकून देण्यात आलेले होते. अनेक जखमींची प्रकृती अद्यापही अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सत्संगाला हाथरससह लगतच्या जिल्ह्यांतील भोले बाबांचे 20 हजारांवर अनुयायी हजर होते. हॉल गर्दीच्या तुलनेत कमी आकाराचाच होता. मोठ्या संख्येने अनुयायी हॉलबाहेरही होते. सत्संग संपला आणि आधी भोले बाबांचा ताफा हॉलबाहेर पडला. सुरक्षा रक्षकांनी तोवर गर्दीला रोखून धरले होते. भोले बाबांचा ताफा बाहेर पडताच सुरक्षा रक्षकांनी गर्दीला मोकाट सोडले. एका माहितीनुसार, भोले बाबांची चरणरज (पावलाखालील माती) उचलण्यासाठीही अनुयायांमध्ये चढाओढ लागलेली होती. ज्याला-त्याला आधी बाहेर पडण्याची घाई होती. लहान हॉल, त्यात गेटही लहानच होते. आधी बाहेर पडण्यासाठी गर्दीत चढाओढ सुरू झाली आणि त्याचेच रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. लोक एकमेकांवर तुटून पडले. महिला आणि मुलांची शक्ती स्वाभाविकपणे कमी पडली आणि ते मोठ्या प्रमाणावर बळी पडले. जखमींमध्येही महिला आणि मुलांचे प्रमाण मोठे आहे. एकदाचा हॉल रिकामा झाला आणि संपूर्ण परिसरात एकच आक्रोश सुरू झाला. बाहेर पडलेले शेकडो लोक पुन्हा आत आले आणि जखमी, मृतदेहांना हलवून पाहू लागले. सोबत नसलेल्या प्रियजनांसाठीचा त्यांचा हा शोधही हेलावून टाकणारा होता.
मृत आणि जखमींची संख्या अधिक असल्याने हाथरसलगतच्या एटा, अलीगड जिल्ह्यांतील रुग्णालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये जखमींना हलविण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इथेच उत्तरीय तपासणीसाठीही मृतदेह पाठवण्यात येणार आहेत. एटातही उत्तरीय तपासणीसाठी 27 मृतदेह आणले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत.