पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मागील सहा महिन्यांत भोसरी, भोसरी एमआयडीसी, महाळुंगे, चाकण परिसरातून 16 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिक बनावट आधारकार्ड बनवून या ठिकाणी वास्तव्यास होते. रोजगारासाठी हे नागरिक भारतात आले असले तरी त्यांच्याकडे वास्तव्य करण्याची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. तसेच, या नागिरकांनी आपली खरी ओळखही लपवल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी नागरिकांनी कागदपत्रे कोठे बनवली. पिंपरी-चिंचवड शहरात येण्याचा त्यांचा नेमका उद्देश काय, याबाबत तपास सुरू आहे.
कंपन्या व कारखान्यांतील व इतर आस्थापनांतील कर्मचारी, कामगार, मजूर यांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, चारित्र्य पडताळणी करण्याबाबत उदासीनता आहे. तसेच घर भाडेतत्त्वार देताना भाडेकरार केला जात नाही. त्यामुळे गुन्हेगार, चोरटे, तसेच परदेशी नागरिकांचे फावते. त्यांना कामगार, मजूर म्हणून ओळख लपवून शहरात वास्तव्य करता येते. यातच घुसखोरही शहरात सहजपणे राहू लागले आहेत.
पुणे परिसरात काही बांगलादेशी घुरखोरांना अटक करण्यात आली होती. यामध्ये बांगलादेशी यंत्रणांकडील एक ‘वाँटेड’ घुसखोर असल्याचे समोर आले. त्यामुळे खळबळ उडाली होती.
घुसखोरांसोबत शत्रू राष्ट्रांचे दहशतवादी प्रवेश करून देशविघातक कृत्य करू शकतात. त्यामुळे शहरवासीयांनी वेळीच धोका ओळखून संशयित व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.