महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असून याच दरम्यान, जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात कार तपासणीसाठी थांबवली असता त्यात अडीच कोटीहुन अधिकची रोख रक्कम आढळून आली.
परंतु चौकशी केल्यावर ती रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची असून बँकेत भरणा करण्यासाठी जात असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत असे की, बेंडाळे चौकात आज गुरुवारी दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. टी. धारबळे हे पथकासह तपासणी करीत होते. याच दरम्यान सुभाष चौकाकडून पांडे चौकाकडे जात असलेली एक कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी करताना त्यात २ कोटी ५३ लाख रोकड आढळून आली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सर्व रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची होती आणि बँकेच्या प्रतिनिधीसह ते भरणा करण्यासाठी जात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी पडताळणी केल्यावर रोकडसह वाहन सोडून देण्यात आले.