राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार..

राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार

विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नेत्यांनी रोजच राजकारणाचा बाजार मांडायचा आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचायचं असं अजून कुठंवर चालणार? याचं कोडं काय सुटेनासं झालंय. लई विचार करून झालंय पर उत्तर काय मिळंना झालंय. राजकारण्यांनी स्वतःचंच घर फोडलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तर म्हणे हे त्यांचं बंड असतं विचार जपण्यासाठीचं म्हणं आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला तर म्हणे आम्ही त्यांच्याशी गद्दारी केली. आम्ही होतो गद्दार आणि ते ठरतात म्हणे कट्टर. एखादा पक्ष उठतो, मेळावा घेतो आणि म्हणतो, कार्यकर्त्यांनी पक्ष चिन्हावरच लढायचं, नाही तर कारणे दाखवा नोटीस पाठवणार घरी. तर त्यांचाच मित्रपक्ष म्हणतो, माझ्याच पक्षाकडून लढलं पाहिजे. यासाठी तो पुन्हा फोडाफोडी सुरू करतो. कोणाला भीती दाखवून, कोणाला आमिष दाखवून, तर कुणाला पैसे चारून, आपल्या गोठात घेतो. कुठली आलीय युती, आघाडी, महायुती, महाआघाडी, तिसरी आघाडी? मालकापुढं सरकारपुढं कोणाचं काय चालणार? कुत्र्याला टाकतात तसा एखादा बंडलाचा तुकडा टाकला, की सुरू होतो लाळघोटेपणा. पैशांना विकत घेता येतात माणसं आणि त्यांची निष्ठाही. काल एकमेकांवर आरोप करणारे आजी-माजी आज गळ्यात गळे घालून विकासासाठी एकत्र आल्याच्या शपथा घेतात. कौतुक काय करतात? आणि ‘ही दोस्ती तुटायची नाही’ म्हणत मिठ्ठ्या काय मारतात?

पेढा काय भरवतात? आणि आम्ही मात्र आजी-माजींचे आपसातील विस्तव ही न जाणारे कार्यकर्ते, गपगुमान गळ्यात मफलर अडकवून, डोक्यावर टोपी घेऊन, त्यांच्या उमेदवारीचे बॅनर भिंतीला चिटकवत जायचे पुन्हा पुन्हा. प्रचारातन दमून भागून आल्यावर चिरमुराचं पोतं सोडायचं, त्यात फरसाण, शेंगदाणे टाकायचं. सोबतीला कांदा फोडायचा आणि फडशा पाडायचा अधाशासारखा भूकबळी होऊ नये म्हणून. लईच मर्जी झाली मालकाची, नेत्यांची तर क्वाटर आणि तांबडा, पांढरा रस्सा झाला की आणि काय लागतंय आम्हाला? ‘नेता लय दिलदार’, ‘नेता लय पॉवरबाज म्हणत बोंबलायला आम्ही मोकळं. सकाळी सकाळी उठायचं, आपल्या अन्नदात्या नेत्यांचं घर गाठायचं, पाया पडायचं, आणि लागायचं प्रचाराला पायाला भिंगरी बांधल्यागत. हलगीच्या तालावर मोडकं तोडकं नाचत, शिट्ट्या वाजवत हलायचं, डूलायचं. नाच गाण्याची हौस भागवून घ्यायची, तेवढाच दमलेल्या आयुष्यामधला दोन क्षणांचा विरंगुळा म्हणून कवटाळायचं त्याला. मीच उमेदवार असल्यागत पाया पडत, सांगत सुटायचं पक्ष आणि चिन्ह. अक्का, मावशी, ताई, अण्णा, बापू म्हणत भीक मागायची मताची. खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी. तिकडे नेतेमंडळी फोडत राहतात आपली घरं, लावतात भांडणं भावाभावात, बाप लेकात आणि भरत जातात आपली घरं, वरकमाई म्हणून. या पक्षातून त्या पक्षात, या युतीतून त्या आघाडीत, मारत राहतात माकड उड्या, विकासाचा ठेका घेतलेल्या मुकादमासारखं आणि आम्हीही उड्या मारू लागतोय नेत्यावरील निष्ठेच्या नावावर कट्टर म्हणून. स्वाभिमान कुठला आलाय? केव्हाच गहाण पडलाय तो पाचशेच्या नोटा आणि चार दोन मांसाच्या तुकड्यासाठी. तेवढीच लायकी आहे आमची. गरिबी हटवणार, रोजगार देणार, कर्जमाफी करणार, खात्यावर पैसे टाकणार, भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार, गावाचं नंदनवन करणार, पाणी देणार, स्वच्छ हवा देणार, चांगले आरोग्य देणार या त्याच त्याच घोषणा 78 वर्षांपासून ऐकत ऐकत आमचे पणजोबा, आजोबा संपून गेले कवाचे. बापाचं राबणं काय संपलं नाही आणि आमच्या हाताला कामच कधी भेटलं नाही,

 

अशी गत झालीय आमची. नेता पाच वर्षात करोडपती होतोय आणि आम्ही अजूनबी निवडणुकीची वाट बघत बसतोय प्रत्येक पाच वर्षाला. पण विचार कोण करतोय? विचार करणार तरी कवा? पोट शांत बसू देत नाही तेव्हा हातात कोयता, चाकू, कट्टा नाहीतर गांजा, अफू, ड्रग्जची सोय केली जातेय सतत गुंगीत ठेवण्यासाठी. आमची पोरं त्यांच्या दोन नंबरच्या कामासाठी तुरुंगात आणि त्यांची पोरं चेअरमन, उद्योगपती, सहकार सम्राट, दादा, भाऊ, युवा नेतृत्व म्हणून आमच्यासमोर उभी आहेतच. तो सिलसिला अखंडपणे न संपणारा, वर्षानुवर्षे, कालही, आजही आणि उद्याही सुरू राहणार. लोकशाही कुठाय? घराणेशाही, राजेशाही, एकाधिकारशाही सगळंच त्यांच्या हातात. मतदार आम्ही, मताचे फक्त ‘दान’ करायचं, मत ‘गेले’ कुठे? हे अजिबात विचारायचं नाही. नाहीतर आहेतच की आमचीच पोरं आमचाच बंदोबस्त करायला, लांब तरी कशाला जायला लागतंय? पाचशेच्या नोटासाठी आणि एक वेळच्या घोटासाठी टपकवायला काय मागे पुढे पाहतात? मेंदूच काढून घेतलाय त्यांनी आमचा. यंत्रमानव, रोबोट बनलोय त्यांच्या हातातील आम्ही. किल्ली दिली की आणि ऑर्डर सोडली की विचार न करताच काम ‘तमाम’ करणारी ‘गुलाम’ झालोय आम्ही. कटपुतळीसारखं नाचवलं जातोय आम्ही. आमच्या दोऱ्या त्यांच्या हातातच राहतील याची खबरदारी ते घेत असतात सदा काळापासून. आहे का हिंमत ही दोरी तोडायची? मी ‘मतदार राजा’ म्हणून ताठ मानेने
जगण्याची? माझं स्वतःचं अस्तित्व जपण्याची? यासाठी पुन्हा एकदा उठावं लागेल आपल्या हक्कासाठी. आपल्या अस्तित्वासाठी. लेखन. संजय आप्पासाहेब सुतार नांदणी,तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर संपर्क 8600857207

  • Related Posts

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित..

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित.. विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड : मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..