शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे खान्देशात प्रथमच सर कार्ल लँडस्टिनर पुरस्काराने विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांचा सन्मान…

जळगाव — शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त शरीर रचना शास्त्र विभागातील सभागृहात नुकताच विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांचा प्रथमच सर कार्ल लँडस्टिनर पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ.मारुती पोटे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील,शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक शेजवळ आदींसह विविध वैद्यकीय विभागाचे विभाग प्रमुख ,सहकारी ,अधिकारी तसेच जिल्ह्यातील रक्तदान शिबिरांचे आयोजक याप्रसंगी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत मांडताना रक्तदान विषयावर सखोल मार्गदर्शन करून रक्तदान जीवनदान देणारे ईश्वरीयकार्य असल्याचे सांगून समाज,सेवाभावी कार्यकर्ते,लहान मोठ्या संस्था,आस्थापने यात स्वयंस्फूर्त सहभागी झाल्यास गंभीर पीडित रुग्णांना वेळीच जीवनदान मिळून रक्तदान हे जीवन संजीवनीच असल्याचे सांगितले तसेच दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी हे नियमित रक्तदान करीत असून ते नेहमी रक्तदान शिबिरांचेही आयोजन करीत आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता इतरांना रक्तदान करण्यासाठी सदैव प्रोत्साहित करीत असतात त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचेही अधिष्ठाता डॉ .ठाकूर यांनी सांगून त्यांचे कौतुक केले.








