भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन संपादनाबाबत खासदार रक्षाताई खडसे , शेतकरी प्रतिनिधींसोबत दिल्ली येथे बैठक संपन्न .

नवी दिल्ली – दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी रेल भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री सौ. रक्षाताई खडसे यांनी भारतीय रेल्वे मंडळाचे चेअरमन व सीईओ श्री. सतीश कुमारजी साहेब यांची सस्नेह भेट घेऊन भुसावळ ते खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन संपादन प्रकल्पाबाबत शेतकरी प्रतिनिधीं सोबत संयुक्त बैठक आयोजित केली.

या प्रकल्पांतर्गत गहूखेडा ते फेकरी या २२ कि.मी. अंतरावरील नवीन भूमी संपादनाचा प्रस्ताव असून भुसावळ तालुक्यातील निंभोरा बु., साकरी, मन्यारखेडा, जाडगाव, फुलगाव, अंजनसोड़ा, कठोरा बु. तसेच रावेर तालुक्यातील गहूखेडा या नऊ गावांचा समावेश आहे. याआधीच या परिसरातील शेतजमिनी औष्णिक विद्युत प्रकल्प, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, नॅशनल हायवे ६, वेल्हाळे पाट, हातनुर धरण, ओझरखेडा धरण व पाइपलाईन, बीटीपीएस पाइपलाईन अशा अनेक प्रकल्पांकरिता संपादित झालेल्या आहेत. त्यामुळे चौथ्यांदा होत असलेले रेल्वे प्रकल्पासाठीचे संपादन शेतकऱ्यांच्या उपजीविकेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सदर संपादनात गहूखेड्यासह ८९ हेक्टर जमीन (एकूण १३० गट) बाधित होत असून, तब्बल २५० शेतकऱ्यांची शेती प्रभावित होणार आहे. त्यात अनेक शेतकरी कायमस्वरूपी भूमिहीन होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध नोंदविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकून केंद्रीय मंत्री सौ. रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चेनंतर रेल्वे मंडळाचे चेअरमन श्री. सतीश कुमार यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधी आणि कायदेतज्ज्ञ अॅड. धीरेंद्र पी. देशमुख यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत शेतकऱ्यांचे होणारे कायमस्वरूपी नुकसान मांडण्यात आले तसेच पर्यायी मार्ग सुचविण्यात आला. शेतजमीन न संपादता रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरच प्रकल्प राबविण्याचा पर्याय समोर ठेवून मंत्री महोदयांनी पुनः सर्वेक्षणाचे आदेश दिले.
या बैठकीस शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजेंद्र साहेबराव चौधरी (माजी सभापती, भुसावळ), प्रा. के. पी. चौधरी (पर्यावरण तज्ज्ञ), शिवाजीराव पाटील (गहूखेडा, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख मुक्ताईनगर), श्कुमार चौधरी (भाजपा तालुका उपाध्यक्ष, माजी सरपंच फुलगाव), श्री. राहुल पाटील आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. धीरेंद्र देशमुख यांनी कायदेशीर व अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली मांडणी करून शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडल्याचे सांगण्यात आले. या बैठकीमुळे शेतकरी बांधवांच्या न्याय्य मागण्यांना नवे बळ मिळाले आहे.








