शहनाई,चौघड्यांच्या गजरात ११११ वृक्षांचे रोपण जिल्हाधिकारी व आयुक्तांचा स्वयं हस्ते सहभाग, पावसाचीही सलामी.

जळगावात आज निसर्ग प्रेमाचा एक अविस्मरणीय उत्सव रंगला. “माझे शहर, माझे वृक्षारोपण” या उपक्रमांतर्गत सनई–चौघड्यांच्या निनादात, ढोल–ताशांच्या तालावर आणि हरित जल्लोषात ११११ वृक्षांचे एकत्रित रोपण पार पडले. वृक्ष लागवड ही केवळ एक योजना न राहता लोकचळवळ कशी बनते, याचा जिवंत अनुभव नागरिकांना मिळाला.
या हरित सोहळ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः वृक्षदिंडी खांद्यावर घेतली, तर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मोटरसायकल तिरंगा रॅलीचे नेतृत्त्व करत रोपण स्थळी दमदार हजेरी लावली. मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर, वनश्री विजयकुमार वाणी, सामाजिक वनीकरण विभागाचे धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक, समाधान मार्तंड सोनवणे कमल ढेपले, रवींद्र तायडे, उज्वला पाटील, अभिमान मोरे, ईश्वर मोरे संदीप सपकाळे, मनपा शिक्षण विभागाचे खालीक शेख यांनी हजेरी लावली.
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने आणि निस्वार्थीपणे काम करणाऱ्या चार पर्यावरणप्रेमींना मराठी प्रतिष्ठान तर्फे ‘वृक्षमित्र पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्धव महाजन, संतोष क्षीरसागर, रफिक भाई पिंजारी आणि अशोक गोपाळ यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या.दे. महाजन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतूनच वृक्षदिंडी वृक्षरोपण स्थळी वाजत गाजत आणली व विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले. या प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के डी.पाटील, उद्योजक अश्विन कुमार चौधरी, सेवानिवृत्त कोषागार अधिकारी शकील देशपांडे, महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, पर्यावरण प्रेमी वसंत पाटील, सुमोल चौधरी
डॉ. लीना पाटील, उडान संस्थेच्या हर्षाली चौधरी, सौ. हिरा चौधरी,शहेनाझ देशपांडे, निलोफर देशपांडे, खुशबू देशपांडे तसेच मनसेचे ललित शर्मा, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, सतीश सैंदाणे, प्रकाश जोशी, चेतन पवार, दीपक राठोड, विकास पाथरे, दीपक धांडे, बंटी बुटवानी, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व पर्यावरण प्रेमी नागरिक उत्साहाने सामील झाले.

शालेय विद्यार्थ्यांनी बॅनर, घोषणाबाजी आणि रंगीबेरंगी फेट्यांनी दिंडीची शोभा वाढवली. निनादणाऱ्या शहनाई चौघड्यांच्या साक्षीने हिरवाईची बीजे रोवली गेली. आणि या सोहळ्याला निसर्गाचीही दाद मिळाली पंधरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने याच क्षणी अवतरून हिरवाईला पहिलीच सलामी दिली. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता, नागरिकांचा सहभाग, प्रशासनाची जिद्द आणि निसर्गाशी असलेली आपुलकी यांचा हरित संगम ठरला.
जळगाव महानगरपालिका, सामाजिक वनीकरण विभाग, सुबिनियो केमिकल्स लिमिटेड व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला.
मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.








