उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये एका शालेय बसला अपघात झाला, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नायगावजवळ बस विजेच्या खांबाला धडकली, ज्यात दहा विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला.लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये एक मोठा अनर्थ टळला. सकाळच्या सुमारास शेरकोटला निघालेली शाळेची बस एका विजेच्या खांब्यावर आदळली. या अपघातात १० मुलं जखमी झाली. बसमध्ये एकूण ५० विद्यार्थी होते. नायगावच्या जवळ हा अपघात झाला. ११ हजार व्होल्ट हाय टेंशन विजेच्या खांबाला बसनं धडक दिली. पण वीज पुरवठा १५ मिनिटांसाठी खंडित झाल्यानं मोठा अनर्थ टळला.
शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नायगावजवळ असलेल्या मंधौरा मार्गावर सकाळच्या सुमारास शाळेची बस उलटली. रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात बस कोसळली. यामध्ये १० विद्यार्थी जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. समोरुन येत असलेल्या बैलगाडीला वाचवताना बसला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच शेरकोट पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्या सहा विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.सकाळी पावणे आठच्या सुमारास बसला अपघात झाला. बस उलटताच विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. अनेक विद्यार्थी धाय मोकलून रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या शेतांमध्ये काम करणारे लोक त्यांच्या मदतीला धावले. मंधौरा गावचा रहिवासी असलेला अरविंद बस चालवत होता. आसपासच्या गावांमधील मुलं बसमध्ये होती. बाबू सिंह मेमोरियल शाळेत मुलांना सोडण्यासाठी अरविंद निघाला होता.









