पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळी कुटुंबीयांनी तार बांधली होती. या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आगमन केले आहे. अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशातच जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेमध्ये वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तासखेडा इथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता-पुत्रीचं नाव आहे. या घटनेमुळे कोळी कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळी कुटुंबीयांनी तार बांधली होती. या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. पण याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. समाधान कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारेवरून रुमाल काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून ते फेकले गेले आणि तार तुटली.याच तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा जोरदार झटका लागला. यावेळी घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवी हिनेही वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाबांची तडफड पाहून अनवधानाने त्यांना स्पर्श करण्यास गेलेल्या मानवी हिलाही विजेचा जोरदार धक्का लागला.









