बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, त्याला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. आता त्यामध्येच कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केली जात आहेत. वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपी कोठडीत आहे. मात्र, या हत्येचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचे कराडकडून सांगितले जात आहे. वाल्मिक कराड हा सध्या बीडच्या कारागृहात आहे. देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात होती. शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला आहे. या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, ही भूमिका आपली पहिल्या दिवसापासून असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले. आता वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप आहे. यादरम्यान कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची बदली करण्यात आलीये. आता कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत. संतोष देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. यातच कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे देखील चर्चेत होते.आता अशातच त्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान बक्सार मुलांनी हे गेल्या तीन वर्षापासून बीडमध्ये कार्यरत होते त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याची माहिती आहे. परंतु कारागृह प्रशासनावर झालेले आरोप आणि त्यानंतर झालेली ही बदली याची आता चर्चा होऊ लागली आहे.










