वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर, सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना उघडं पत्र लिहिलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच असं वर्तन होत असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल त्यांनी केला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राज्य महिला आयोग आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हिने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवी हगवणे हिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती अशी टीका चाकणकर यांच्यावर होत आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर समर्थक आक्रमक झालेत.
रूपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ पुण्यातील बालगंधर्व चौक या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रूपाली चाकणकर समर्थक फोन करून धमक्या देत आहेत, तसेच फोटो मॉर्फ करून बदनामी देखील करत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाच्यानेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक खुल पत्र सुद्धा लिहिलं आहे.या पत्रामध्ये सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले आहेत. ‘महिलांच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर ज्यांना बसवलेले आहे त्याच बाई जर, हगवणे प्रकरणात प्रश्न विचारला म्हणून त्यांच्या या ब्लॅकमेलर गँग मार्फत निवड इतक्या गलिच्छ पद्धतीने आमच्यावर टिप्पणी करत असतील तर आम्ही न्याय आता कुणाकडे मागायचा?’ असा अंधारे या पत्रात म्हणाले आहेत.









