भारतात जी काही प्रकरणं समोर आली आहेत ती सध्या खूपच सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असं आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.करोनाने पुन्हा एकदा जगात दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता भारताचंही टेन्शन वाढलं आहे. तर, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही काही रुग्ण समोर आले आहेत. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सध्या देशातील सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत ६९ सक्रिय करोना रुग्ण सापडली आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ३४ सक्रिय रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रातही करोनाची ४४ सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्रातही आरोग्य विभाग करोनाच्या वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्येही करोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे.सध्या दिल्लीत करोनाचे तीन सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटक आणि गुजरातमध्ये अनुक्रमे 8 आणि 6 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त, हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आढळला आहे.









