मावळमधील तिकोना येथे वन विभागाने केलेल्या कारवाईत शिकारीच्या साहित्यासह मांस जप्त केले असून सुखमित भुतालियाला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, जुन्नरमध्ये हडसर किल्ल्याजवळ २१ शिकाऱ्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि शिकारीची जाळी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी चार जणांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.मावळ तालुक्यातील तिकोना गावामध्ये वन विभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी मारलेल्या छाप्यामध्ये शिकारीच्या साहित्यासह शिकार ताब्यात घेण्यात आली. आरोपीकडून ५२ किलो मांस, दोन बंदुका, जिवंत आणि वापरलेली काडतुसे, शिकार सोलणीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत सुखमित हरमितसिंग भुतालिया (वय २६ वर्षे, रा. तिकोना) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम ९ आणि ५१ अंतर्गत वन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. बेकायदा शिकारीसंदर्भात मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वन विभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी तिकोना येथील सिंग बंगल्यावर छापा मारला. त्या वेळी भुतालिया याला मुद्देमालासह पकडण्यात आले.
कमाल किमान (अंश सेल्सिअसमध्ये)
उप वनसंरक्षक तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पथकात वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल सीमा पालोदकर, गणेश म्हेत्रे, संदीप अरुण, शेळके यांचा समावेश होता. ताब्यात घेतलेल्या मांसाचे नमुने नागपूरमधील गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन केंद्रात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शस्त्र व काडतुसांविषयी तपासासाठी पोलिस यंत्रणेशी समन्वय साधण्यात येत आहे.वन्यजीवांच्या शिकारीसाठी गेलेल्या २१ शिकाऱ्यांना वन विभागाच्या पथकाने पकडले. हडसर किल्ल्याखालील राखीव वनक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी २१ जणांविरोधात जणांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिकारीचे नेतृत्व करणाऱ्या चार जणांना जुन्नर न्यायालयाच्या प्रथम न्यायदंडाधिकारी नम्रता बिराजदार यांनी दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या कारवाईत २१ वाघुरांसह (शिकार पकडण्यासाठी वापरली जाणारी मोठी जाळी) १० दुचाकी आणि १४ मोबाइल असा जवळपास सात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.इतक्या मोठ्या संख्येत शिकारी पकडण्याची ही गेल्या ३० वर्षांतील पहिलीच कारवाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येत शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ही बहुदा पहिलीच घटना असल्याचे सातपुते यांनी सांगितले.









