प्रीती सुदन यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागी अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय कुमार हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. माजी केंद्रीय सचिव अजय कुमार (Ajay Kumar IAS) यांची यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जवळपास अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार असून ते ऑक्टोबर 2027 पर्यंत या पदावर राहणार आहेत. अजय कुमार यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आली आहे. अजय कुमार हे 1985 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांना 40 वर्षांचा अनुभव आहे. याआधी प्रीती सुदन या यूपीएससीच्या अध्यक्षा होत्या. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल रोजी संपला.अजय कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी केली. ते इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअर्सचे फेलो देखील राहिले आहेत.










