वडिलांच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. हर्षद योगी असे मृत मुलाचे नाव आहे. करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.सोलापूर: वडिलांचा अंत्यविधी उरकून घराकडे निघालेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वडिलांनंतर मुलानेही प्राण गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षद झंकार योगी (वय ३५) असं मृत मुलाचे नाव आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बंगळुरू येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत जाताना मुलाच्या वाहनाला १३ मे रोजी करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील वरकुटे इथं पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
दिनेश हिरा नाथयोगी (वय ४०), कृष्णा गोरबहादुर कुवर (वय ५०),पुष्कर झंकर योगी (वय ३०) तिघेही (रा. वापी, गुजरात) व निशा हर्षद योगी (वय ३५, रा. बंगळुरू) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बंगळुरू येथे गेले होते. परत गुजरातकडे जाताना रेल्वेतून पडून झंकर योगी यांचा मृत्यू झाला होता. झंकर योगी यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यविधी उरकून परत गावी गुजरातकडे निघाले होते. मात्र १३ मे रोजी पहाटे कुर्डुवाडीवरून येत असताना वरकुटे गावाजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली.









