जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे.पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भगवा हाती घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माज़ी नगरसेविका मनाली पाटील, माज़ी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माज़ी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी (शरद पवार) कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माज़ी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जनसंपर्क विभागामार्फत पाठवलेल्या निमंत्रण मेसेजमध्ये पक्षप्रवेशासाठी 10.10 वाजताची वेळ ठरवण्यात आलेली होती. मुळात ठाण्यामधील या सर्व माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टायमिंग साधत हा पक्षप्रवेश घडवून आणलेला पाहायला मिळतो आहे. साधारणतः पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम वेळेत होत नाहीत, असा अनुभव सर्व माध्यम प्रतिनिधींचा आहे. मात्र नेहमी उशिरा होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनी फाटा देत आज वेळेत कार्यक्रम उरकून घेतला.









