गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या हस्ते नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी २५-३० वर्षांपूर्वी पॅसेंजरने भरलेली बस चालवण्याची वेळ आल्याचा किस्सा सांगितला.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते आज गुहागर येथे नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर एसटी डेपोत या बसेसचा लोकार्पण सोहळा केल्यानंतर गुहागर एसटी डेपोच्या आवारातच या नवीन बसेसची ट्रायलही घेतली. यावेळी त्यांनी २५ ते ३० वर्षांपूर्वी घडलेला एक मोठा प्रसंग सांगितला. आपल्यावर एकेकाळी पॅसेंजरने भरलेली एसटी बस चालवण्याची वेळ का आली? त्याचा किस्साही सांगितला.
‘पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मी एकदा ओमळी ते चिपळूण असा प्रवास करत होतो, त्यावेळी चालक अचानक आजारी पडला, त्याच्या अंगात गाडी चालवण्याचा त्राण राहिला नाही. त्याला उलट्या सुरू झाल्या. तो अत्यवस्थ झाला. एसटी ड्रायव्हर आजारी पडला त्यामुळे मला पॅसेंजरने भरलेली बस ओमळी ते चिपळूण अशी आणावी लागली. आजही मी ही बस डेपोतच का चालवली, बाहेर चालवली तर या गोष्टीचं कुणीतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय गुहागरच्या एसटी डेपो मॅनेजरला याचा जाब विचारेल की आमदार एसटीची गाडी बाहेर कशी काय चालू शकतात? म्हणून मी डेपोच्या आवारातच ही ट्रायल घेतली. कारण हल्ली महाराष्ट्रात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करण्याची अतिशय घाणेरडी प्रथा पडली आहे’, असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.









