आपले वसतिगृह सांस्कृतिक, शैक्षणिक केंद्र बनवा– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन.
जळगाव दि. 18 “ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात, त्या वसतिगृहाची ओळख केवळ निवासस्थळ म्हणून न राहता, ती सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून निर्माण व्हायला हवी. न्यायहक्कासाठी संघर्ष गरजेचा आहेच; मात्र सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि संधींचा उपयोग करून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती साधावी,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत उपक्रमशीलतेवर भर दिला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या पुस्तकाचे प्रा. संदीप केदार यांनी अनुवाद केलेल्या 500 प्रतींचे मोफत वितरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. हे वितरण जैन इरिगेशनच्या सौजन्याने करण्यात आले.प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. त्यांनी वसतिगृहास उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती दिली. या सुविधांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.मंचावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,
जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे व जावेद तडवी, अनुवादक प्रा. संदीप केदार, अनिल सोनवणे, बांभोरीचे सरपंच बिर्हाडे तसेच गृहप्रमुख बच्चे व गाडे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि पारंपरिक नृत्य सादर करून जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. प्रा. संदीप केदार व जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.या वेळी इंदाई प्रकाशनचे देवेंद्र करकरे, वसंत राठोड, संतोष खोपडे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या समारोपात बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, अभ्यास, नृत्य, व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व कौशल्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी उपस्थित 500 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत दिलखुलास संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.









