पुण्यातील भोर मतदारसंघावर संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असून त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील सहा वेळा आमदार होते. राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.










